Hanuman Sena News

शिवचरित्राचा जागर! किल्ले निर्मिती, चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...


मलकापुर : दि.18 फेब्रुवारी 2025 नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता "जागर इतिहासाचे, जतन संस्कृतीचे" या विषयांतर्गत शिवचरित्रातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित किल्ले निर्मिती, चित्रकला, वेशभूषा, प्रश्नमंजुषा, कथाकथन अशा आदी स्पर्धांचे आयोजन दि.१८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य डॉ.जयंत राजूरकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील ज्येष्ठ संपादक रमेश उमाळकर, पत्रकार धीरज वैष्णव यांची उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती, किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्यासाठी दिलेले योगदान याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून टाकाऊ पदार्थांपासून किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९० विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांची निर्मिती केली. काही विद्यार्थ्यांनी राजगड, सिंहगड, प्रतापगड, रायगड, तोरणा, पन्हाळा यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे प्रतिरूप तयार केले. कला शिक्षक श्री. दीपक येवलकर यांनी या किल्ले निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथींनी सर्व किल्ल्यांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्याला वाव मिळावा म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांनी महाराजांचे विविध मुद्रा आणि पराक्रम दर्शविणारी सुंदर चित्रे साकारली. कला शिक्षक श्री. प्रमोद किन्होळकर यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. शिवचरित्राचा गाढा अभ्यास व्हावा म्हणून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली गेली. यामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापन करण्यातील अडचणी, गुरुवर्य दादाजी कोंडदेव, माता जिजाऊ यांचे संस्कार, अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, गनिमी कावा, किल्ल्यांचे महत्त्व अशा विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. तसेच, वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थी शिवाजी महाराज, जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी, मावळे,यांच्या वेशभूषेत अवतरले होते.विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने वातावरण इतिहासमय झाले.शिवचरित्रावरील कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महाराजांच्या पराक्रमाचे किस्से प्रभावीपणे सादर केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि त्यांच्या इतिहासावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद काळे यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्राचा सखोल अभ्यास, किल्ल्यांचे महत्त्व, ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. स्वराज्य, स्वाभिमान, नेतृत्व, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचे मूल्य या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.

Post a Comment

أحدث أقدم