मलकापुर: दि.10 फेब्रुवारी 2025 नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प. पू. डॉ. हेडगेवार सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.सानिया वाघमारे, कु.भाग्यश्री बोपले, कु.चैताली चव्हाण,कु. अर्पिता नरवाडे, कु.स्मिता नरवाडे. कु.समृद्धी चांदवडकर, कु. दिव्या ढोकणे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत, शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणाचा उल्लेख करत, भविष्यात मिळणाऱ्या संधींचे सोनं करण्याचा निर्धार व्यक्त केला.यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. संजयसिंह तोमर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी "INDIA" या शब्दाच्या प्रत्येक अक्षराला अर्थ देत एक सुंदर संदेश दिला. या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील यशासाठी आवश्यक गुणांची जाणीव करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून नियोजन आणि अंमलबजावणीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. शिवरायांनी जसे आपल्या ध्येयासाठी योग्य नियोजन करून ते यशस्वीपणे अमलात आणले, तसेच विद्यार्थ्यांनीही त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा ठरवून त्यावर निष्ठेने काम करावे, असा संदेश त्यांनी दिला.तसेच, त्यांनी ससा आणि कासवाच्या प्रसिद्ध गोष्टीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना स्व-परीक्षण, स्वतःच्या क्षमतांचा विचार आणि कौशल्यांची जाणीव करून घेत योग्य शैक्षणिक क्षेत्राची निवड करण्याचा सल्ला दिला.यानंतर समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर सरांनी विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने प्रेरणा दिली. त्यांनी एक मोठा पांढरा कागदावर आधीच चित्र काढून आणले होते. त्या चित्राच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात संघर्षाचे स्थान काय आहे, याचे प्रभावी विवेचन केले. शालेय जीवनातील कष्ट व संघर्ष भविष्यातील आनंद आणि यशाचा पाया कसा ठरतो, हे त्यांनी कमी वेळात प्रभावीपणे पटवून दिले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. रवींद्र गणगे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात निरोप समारंभ संपन्न...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق