Hanuman Sena News

कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के...







मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे कट्टर नेते असलेल्या अनेकांनी बंडखोरी केल्याने भाजप चिंताग्रस्त झाला आहे. इतकी वर्षे तुम्ही आम्हाला देतो देतो म्हटले पण कधीही उमेदवारी दिली नाही, आता आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याने चिंता वाढली आहे.मित्रपक्षांविरुद्धही भाजप नेेते उभे आहेत. भाजपविरुद्ध भाजप असे चित्र बऱ्याच ठिकाणी आहे.  चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपला बंडखोरांनी धक्के दिले आहेत. दिल्ली, मुंबईपासूनच्या नेत्यांनी ‘ऑपरेशन समजूत’ हाती घेतली असली तरी अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही उमेदवाराने दिलेला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.गडचिरोली मतदारसंघात माजी आमदार देवराव होळी यांनी पक्षाने उमेदवारी नाकारूनही दंड थोपटले आहेत. तिथे मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार आहेत. अहेरीमध्ये मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे महायुतीचे (अजित पवार गट) उमेदवार आहेत आणि तिथे माजी राज्यमंत्री अंबरिशराव आत्राम (भाजप) बंडखोर आहेत. आर्वी (जि.वर्धा) येथे आमदार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज भरला, लढविण्यावर ते ठाम आहेत. तिथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे भाजपचे उमदेवार आहेत.अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरणारे माजी स्थायी समिती अध्यक्ष तुषार भारतीय यांनी महायुतीचे उमेदवार युवा स्वाभिमानीचे रवि राणा यांना आव्हान दिले आहे. खामगावमध्ये आमदार आकाश फुंडकर यांची डोकेदुखी अमोल अंधारे यांनी वाढविली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.अकोला पश्चिममध्ये भाजपचे विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध हरिश अलिमचंदानी यांनी बंडखोरी केली. याच मतदारसंघात भाजपचे डॉ. अशोक ओळंबेही लढत आहेतबुलडाणा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिंदेसेनेचे उमेदवार आ.संजय गायकवाड यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आ.गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय हे चिखलीत भाजपच्या उमेदवार आ.श्वेता महालेंविरुद्ध लढत आहेत. नाशिकच्या चांदवडमध्ये विद्यमान आमदार राहुल आहेर यांच्याविरोधात त्यांचे बंधू केदा आहेर मागे हटायला तयार नाहीत.अहमदपूरमध्ये (जि. लातूर) महायुतीत अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील उभे आहेत आणि माजी आमदार बब्रुवान खंदाडे आणि २०१४ ची निवडणूक कमी मतांनी हरलेले गणेश हाके या दोघांनी बंड केले आहे. मी हटणार नाही, असे हाके यांनी पक्षाला कळविले आहे. आष्टीतील पक्षाचे उमेदवार सुरेश धस यांच्याविरुद्ध माजी आमदार भीमराव धोंडे दंड थोपटून आहेत.हिंगोलीत तानाजी मुरकुटेंना भाजपचे रामदास पाटील सुकटणकर यांनी आव्हान दिले आहे. गेवराईत अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांना महायुतीने उमेदवारी दिली, तिथे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांनी बंड केले. नांदेड दक्षिणमध्ये शिंदेसेनेचे आनंद बोढारकर यांच्याविरुद्ध भाजपचे दिलिप कंदकुर्ते हे तगडे बंडखोर आहेत. "लोकसभा, विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागणारे विश्वजित गायकवाड यांनी उद्गीरमध्ये अपक्ष लढत आहेत आणि महायुतीचे मंत्री संजय बनसोडे (अजित पवार) तिथे लढत आहेत. बनसोडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. गायकवाड यांच्या माघारीसाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजते. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला भेटलो असे ते म्हणाले.मुंबईच्या बोरीवली मतदारसंघात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मैदान सोडायला नकार दिला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्यांना भेटले पण ते ऐकायला तयार नाहीत. पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळेंविरुद्ध मधुकर मुसळे तर पुणे कँटोन्मेंटमध्ये सुनील कांबळेंविरुद्ध भरत वैरागे हे भाजप नेतेच उभे असल्याने पुण्यात ऐन दिवाळीत भाजपलाच फटाके लागले आहेत.बंडखोरांना समजविण्याची मोहीमभाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी एक तातडीची बैठक घेऊन बंडखोरी शमविण्यासाठी पक्षसंघटनेला सक्रिय केले. जिल्हाध्यक्ष आणि अन्य नेत्यांनी उमेदवारांची तातडीने मनधरणी करावी अशा सूचना दिल्या. बंडखोर उमेदवारांच्या निकटवर्तीयांचीही त्यासाठी मदत घ्या असे सांगण्यात आले आहे."एका मतदारसंघात किती बंडखाेर? : अमरावती शहरात अजित पवार गटाच्या आ. सुलभा खोडके यांच्याविरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता रिंगणात आहेत. मेळघाटमध्ये भाजपने केवलराम काळे यांना उमेदवारी दिली पण माजी आमदार प्रभूदास भिलावेकर मैदानात आहेत. या शिवाय ज्योती मालवे-सोळंके आणि सविता अहाकेही लढत आहेत.तिवसामध्ये राजेश वानखेडे या अधिकृत उमेदवाराला भाजपचेच रविराज देशमुख यांनी आव्हान दिले आहे. अचलपूरमध्ये प्रवीण तायडे यांना पक्षाचेच सुधीर रसे भिडले आहेत. तिथे प्रमोद गड्रेल हेही भाजपचे कार्यकर्ते लढत आहेत. उमरखेडमध्ये भाजपचे माजी आमदार राजेंद्र नगरधने मनसेकडून मैदानात आहेत. साकोलीमध्ये अविनाश ब्राह्मणकर भाजपचे उमेदवार आहेत. ते राष्ट्रवादीतून आलेले आहेत, त्यामुळे भाजपमध्ये असंतोष आहे. डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांनी बंडखोरी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم