बारामती : मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' या योजनेप्रमाणे राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर शनिवारी(दि ५) ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्याचबरोबर दिव्यांगांसाठी राजकीय आरक्षण लागू करावं,या मागणीसाठी प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यातील दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन द्यावी, बेघर, भूमीहीन दिव्यांगांना घरासाठी नऊ गुंठे जागा द्यावी, राज्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना दहा टक्के आरक्षण द्यावे, औद्योगिक वसाहती मध्ये दिव्यांगांना चार टक्के रोजगार उपलब्ध करून द्यावा, ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका हद्दीतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे, स्टॉल द्यावे, औंध रुग्णालय या ठिकाणी दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीतून दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे काम सूरू आहे, मात्र या कामात प्रचंड अनियमितता सुरू असून याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर करवाई करावी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाची पुणे येथील इमारत प्रशस्त पद्धतीने बांधण्यात यावी,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाचं बोलणं होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला.यावेळी शासकीय अधिकारी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उशिरा पर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर, संपर्क प्रमुख ज्ञानदेव मिंढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पवार यांच्या निवासस्थान समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
दिव्यांगांना ६ हजार पेन्शन द्या', बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे आंदोलन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق