Hanuman Sena News

अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा येथे वर्षा ऋतुच्या आगमनार्थ वृक्षारोपण संपन्न...


  अरे निसर्गावर प्रेम करा। एरवी बिघडेल समतोल 
  अरे माणसावर प्रेम करा। मानवाचा जातोय तोल 



नांदुरा: संपूर्ण जगभरात प्रदूषणाची समस्या हा चिंतेचा विषय बनलेला आहे. तलाव, विहिरी आणि नद्या यांचे पाणी बऱ्याच प्रमाणात दूषित झाले आहे. नदीच्या घाटावर असंख्य म्हशी पोहणे, नाले आणि गटाराचे पाणी नदीत सोडणे यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. तलावात रोगी माणसे स्नान करतात. कारखान्यातील अशुद्ध पाणी तलावात सोडतात. पाण्याप्रमाणे वातावरणातही प्रदूषण वाढले आहे. शहरातील धावणाऱ्या मोटर, स्कुटर मधील धुराने वातावरण प्रदूषित होते, जंगल नष्ट झाल्याने शुद्ध हवेचे प्रमाण कमी होत आहे.वातावरणाचे संतुलन बिघडत आहे. पाण्याचे प्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करून थांबवता येईल, परंतु वातावरणातील प्रदूषण दूर करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे याकरिता झाडे लावणे हेच सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.झाडे लावणे म्हणजे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या भावनेतून त्यांच्यावर प्रेम करणे असे होय.वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते. विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो. घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते. ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात, दळणवळण होते, व्यवहार वाढतो, हीच झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. अश्याप्रकारचे वृक्षाचे असंख्य उपयोग आहेत.वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे. अश्याप्रकारच्या बऱ्याच गोष्टी वृक्ष आपल्याला देतात, अगदी निस्वार्थपणे..! आपण वृक्षतोड न करता वृक्षारोपण केल्यास नक्कीच काही प्रमाणात निसर्गाची परतफेड करता यावी याकरिता परोपकाराच्या वर्षा ऋतुचा आढावा घेत आज मंगळवार दि. ०९/०७/२०२४ रोजी  अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे परोपकाराच्या भावाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका गायत्री गणगे यांनी मुलांना 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या विषयावर संबोधित केले. सर्व मुलांना वृक्ष हेच आपले खरे मित्र आहेत हे उदाहरणासहित पटवून दिले या सोबतच सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी एक -एक झाड दिले. शाळेतील माळी श्री. नारायण भोपळेकाका यांनी वृक्षारोपणासाठी लागणारे साहित्य व सुपीक माती उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेच्या भावनेने झाडे लावली व आजपासून झाडांवर प्रेम करून 'झाडेच आपले खरे मित्र' संबोधण्याचे आश्वासन दिले. वृक्षारोपन कार्यक्रमामधे मार्गदर्शिका सौ. सरिताताई बावस्कार, छोटे -मोठे विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांना जगविण्याचा संकल्प केला. सर्वांनी 'किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे ' अशे आवाहन संपूर्ण शाळेच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم