Hanuman Sena News

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, संचालकांसह १६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा...


खामगाव: सुरक्षा रक्षक कामावर नसताना तब्बल ३२ लाखांची खोटी बिलं काढणे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, सचिव, कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच अंगलट आले. याप्रकरणी तक्रारीवरून १६ जणांविरोधात शहर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.याबाबत सविस्तर असे की, राहुल बुध्दम अबगड संचालक सम्यक साक्षी सेक्युरिटी ॲन्ड लेबर कंत्राटदार रा. वाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता. बिलं काढून ३२ लाखांचा अपहार करण्यात आला. अपहारानंतर मिटींगमध्ये या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद श्यामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, हिंमत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली दिलीप मुजुमले, सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंह जाधव, निरिक्षक विजय इंगळे, रोखपाल गिरीश सातव यांच्यासह १६ जणांविरोधात भादंवि कलम ४२०, ४०९, ४७७-अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रविण नाचनकर करीत आहेत.बैठकीला अनुपस्थित संचालकांना दिलासा प्राप्तमाहितीनुसार, अपहारानंतर मंजुरीसाठी पार पडलेल्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या संचालकांना दिलासा मिळाला आहे. यात उपसभापती संघपाल जाधव, राजेश हेलोडे, अशोक हटकर, विनोद टिकार, राजाराम काळणे, शांताराम पाटेखेडे या सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचा समावेश आहे.खोटी बिलं काढण्यासाठी दबाव
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, रोखपाल आणि कर्मचार्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी वाढीव बिले सादर करण्यासाठी दबाव आणला.असा खळबळजनक आरोपही तक्रारदार राहुल अबगड यांनी तक्रारीत केला आहे.सभापतींसह संचालक फरार गुन्हा दाखल झाल्यानंतर सभापतींसह गुन्हा दाखल झालेले संचालक, रोखपाल, निरिक्षक आणि आरोपी कर्मचारी नॉटरिचेबल असून अनेकजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे खामगावसह बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم