Hanuman Sena News

...तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे आमदार पाडणार; मनोज जरांगे पाटील संतापले...






लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. जालन्यातील काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनाही या आंदोलनाचा फायदा झाला आणि काळे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना पराभूत केलं. या पार्श्वभूमीवर नुकतीच कल्याण काळे यांची मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी मनोज जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विरोधात तुमच्या नेत्यांनी वक्तव्य केलं तर मी विधानसभेला काँग्रेसचेही सर्व उमेदवार पाडून टाकेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील उपोषणावेळी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या मागणीविरोधात भूमिका घेत ओबीसी एल्गार मेळाव्यांचं समर्थन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.अंतरवाली सराटी इथं ८ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती केली आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी या मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यामुळे जरांगे यांच्या या मागण्यांना आगामी काळात सरकारकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार काल म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारकडून सगेसोयरे अधिसूचनेबाबत निर्णय घेण्यावर कोणी आणि काय बोलायचं, हे आमचं ठरलं आहे. आगामी काळात आम्ही यात लक्ष घालून मार्ग काढू," अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे

Post a Comment

أحدث أقدم