खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील आयपीएल जुगाराचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या खामगावात शुक्रवारी पोलीसांनी धाडसी कारवाई केली. स्थानिक रेखा प्लॉट भागात सुरू असलेल्या एका आयपीएल जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकास ताब्यात घेतले. तर तिघांवर शिवाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे खामगाव शहरातील आयपीएल जुगारी आणि बुकींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.तक्रारीनुसार, शहरातील रेखा प्लॉट भागात आयपीएल सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलीसांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर शिवाजी नगर पोलीसांनी सापळा रचून जुगार सुरू असलेल्या दीपक अजय करपे (२४) याच्या घरी छापा मारला. यावेळी दीपक करपे हा मोबाईलवर आयपीएल मधील गुजरात विरुद्ध पंजाबचा सामना बघून ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेताना आढळून आला. त्याला रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या जवळून तीन जुने वापरते मोबाईल आणि रोख ५०० रुपये सट्टा खेळण्यासाठीचे इतर साहित्य असा ९ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलीसांच्या ताब्यातील करपे याने सट्टा घेतल्यानंतर कॉल रेकार्ड आणि उतारा व्हाटसअपवर मालक आणि बुकीला पाठविला. त्यानंतर पोलीस हवालदार संदीप टाकसाळ यांनी दिलेली तक्रार आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून अमन उर्फ रघू विजय तिवारी रा. सतीफैल, संदीप वर्मा रा. तलाव रोड यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला.या कारवाईमुळे शहरातील आयपीएल सट्टा लावणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, कारवाईच्या दरम्यान राजकीय व्यक्तीचे नाव समोर आल्यामुळे या परिसरात रात्री चांगलाच हायहोल्टेज ड्रामा रंगला होता. त्यामुळे शिवाजी नगर पोलीसही काहीकाळ चक्रावले होते.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर हे मोबाईल बँकेसह आयपीएल जुगाराचे सर्वात मोठे केंद्र आहे.
إرسال تعليق