Hanuman Sena News

""मी माफी मागितली होती, पण..." तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिक्रिया"



भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (दि.3) जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या यादीत भाजपाने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा यांना तिकीट दिले आहे. प्रज्ञा ठाकूर या अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात राहिल्या आहेत. दरम्यान, तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.माझ्यासाठी संघटना सर्वोपरि आहे आणि संघटना जी काही जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन, असे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच, मी काही शब्दांचा वापर केला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडला नसेल, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, प्रज्ञा ठाकूर यांना त्यांच्या वक्तव्यामुळे तिकीट रद्द करण्यात आले का?असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, मी दिलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली होती, पण त्यांना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता आणि मी तसे केले नाही.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५  उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये भाजपाने मध्यप्रदेशातील 29 पैकी 24 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भोपाळमधून आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज्यातील दोन विद्यमान खासदार यावेळी निवडणूक लढवताना दिसणार नाहीत. यामध्ये प्रज्ञा ठाकूर आणि केपी शर्मा यांचा समावेश आहे. केपी शर्मा यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढवणार आहेत. प्रज्ञा ठाकुरांबाबत काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर नाराज झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा देशभक्त आहे, असे विधान ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर मोदी म्हणाले होते की, याबाबत मी प्रज्ञा ठाकूर यांना माफ करु शकणार नाही. गोडसेबाबतच्या वक्तव्यावर प्रज्ञा ठाकूरांनी माफी मागितली आहे, मात्र, मी त्यांना कधीही माफ करु शकणार नाही, असे पीएम मोदी म्हणाले होते. 

Post a Comment

أحدث أقدم