मुंबई : शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. तसेच, जनमानसात त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता तसेच पुरूष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट परिधान करावी. जीन्स टी शर्ट चालणार नाही किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको, असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे.विद्यार्थ्यांना जसा गणवेश अनिवार्य असतो त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व शिक्षकांनाही ड्रेसकोड असणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याशिवाय सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे, जसे डॉक्टरांना डॉ. लावता येते. तसा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. शिक्षकांचे समायोजन करताना नव्या नियमांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर एका कार्यक्रमादरम्यान मुंबईत बोलत होते.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने सूचना जारी केल्या आहेत.१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा , जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंर्गाचे वा चित्र विचित्र नक्षीकाम असलेले शर्ट परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी शर्टचा वापर करू नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी
४) शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.
إرسال تعليق