Hanuman Sena News

एकनाथ खडसे यांना सुनेकडून भाजपमध्ये परतण्याचं आवाहन...



जळगाव: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत होणाऱ्या इनकमिंगमध्ये वाढ झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परतू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यानंतर स्वत: एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपण शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं. मात्र आज खडसे यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावं, अशी आपली इच्छा असल्याचं म्हटलं. त्यावर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना एकनाथ खडसे म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून आपण भाजपमध्ये काम केलं. परंतु काही कारणास्तव आपल्याला भाजप सोडून राष्ट्रवादीत यावं लागलं. आता मात्र आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केलं असून पुढील काळात देखील आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार आहोत," असा खुलासा खडसे यांनी केला आहे.विविध नेत्यांच्या भाजपमधील प्रवेशाबद्दल प्रश्न विचारला असता रक्षा खडसे म्हणाल्या की, "एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, कारण तो वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पक्ष काय निर्णय घेतो, नाथाभाऊंचे त्यावर काय मत आहे, हे घडल्यानंतर सर्वांना समजेल. परंतु एक कार्यकर्ता म्हणून बऱ्याच लोकांचीही च्छा आहे की, नाथाभाऊंनी भाजपमध्ये येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे." 

Post a Comment

أحدث أقدم