Hanuman Sena News

गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना !


बुलढाणा: मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बसस्थानक परिसरात उभ्या चारचाकी वाहनातून तब्बल ९ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत, गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी आज मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रक्कम काढली. त्यांनतर दोघा अज्ञातांनी त्यांच्या चारचाकीचा बेमालूमपणे दुचाकीने पाठलाग सुरू केला.देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली. हा प्रकार लक्षात येताच संतोष लद्दड हादरले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले असता, दुचाकीस्वार दिसून आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याचे राजेश शिंगोटे करत आहेत. इतरत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم