Hanuman Sena News

१५ लाख विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी ॲप, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय




 मुंबई: करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड, कल, क्षमता विचारात घेऊन त्यांचे समुपदेशन करणारी, गरज भासल्यास शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट (कलचाचणी) घेऊन त्यांचा शाखा, विषय निवडीचा मार्ग सुकर करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. २०२३-२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून करिअर निवडीविषयी गोंधळ असलेल्या निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्याची योजना आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना विभागाचे प्रशिक्षित समुपदेशक शिक्षक आणि ॲपच्या मदतीने करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले जाईल.गेली ६० वर्षे हे काम विभागाच्या व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेमार्फत (आयव्हीजीएस) होत होते. राज्यात नऊ ठिकाणी या संस्थेमार्फत कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना विद्यार्थ्यांना करिअरविषयक समुपदेशन करून घेता येई; परंतु २०१७ साली ही संस्था मोडीत काढून एका खासगी संस्थेमार्फत दहावीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ३०-४० ढोबळ प्रश्नांवर आधारलेली कलचाचणी घेऊन त्याचा अहवाल निकालासमवेत देण्याचा घाट विभागाने घातला. ही कलचाचणी सदोष असल्याचे आक्षेप घेतले गेल्याने २०१९ मध्ये ती गुंडाळावी लागली.कोविडनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समुपदेशन सेवेत खंड पडला होता; परंतु आता आपण ती पुन्हा सुरू करत आहोत. त्याकरिता ४० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी २७ हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल.विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, आवड, क्षमता, कल, समायोजन याचा विचार करून ही चाचणी घेतली जाईल. दहावी परीक्षेच्या आधी किंवा नंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूट टेस्ट घेतली जाणार नाही. करिअरच्या बाबतीत गोंधळलेल्या ज्या विद्यार्थ्यांची समुपदेशक शिफारस करेल, केवळ त्यांचीच चाचणी होईल.

Post a Comment

أحدث أقدم