Hanuman Sena News

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी देवी.

आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड

सप्तशृंगी गड : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ अर्थात श्री क्षेत्र सप्तशृंगगड हे मोठ्या प्रमाणात धुके, अतिवृष्टीसह हिरवा निसर्ग, दऱ्या-खोऱ्या आणि वन्यप्राणी यांच्या विविधांगी सौंदर्याने नटलेला परिसर असून, भाविकासह पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचे ठिकाण ठरलेले आहे.श्री सप्तशृंगी (भगवती) हे आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. एकूण १८ हातांत विविध शस्त्रे अस्त्रे धारण केलेली भगवती ही महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीचे त्रिगुणात्मक स्वरूप असून देवीचा आकार ११ फूट उंच व ९ फूट रुंद असून, पूर्वमुखी व डाव्या बाजूला जराशी झुकलेली मान स्वरूपातील अतिसुंदर व विशाल मूर्ती आहे. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या मार्कडेय ऋषींनी लिहिलेल्या दुर्गासप्तशतीचे श्रवण करत असताना भगवती या शिखरावर ध्यानरूपी विराजमान झाली. सह्याद्रीच्या सात विविध शिखरांच्या (श्रुंग) परिसरात विराजमान झालेली देवी म्हणून भगवतीच्या या स्वरूपाला सप्तशृंगनिवासिनी देवी असे संबोधले गेले आहे.प्रभू श्रीरामचंद्र यांनी दंडकारण्यातील प्रवासादरम्यान भगवतीचा कृपाशीर्वाद घेऊन पुढील प्रवासात मार्गक्रमण केल्याचे संदर्भ रामायणात आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांची सप्तशृंगीदेवी ही कुलस्वामिनी आहे. (संदर्भ: ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ वा अध्याय) नवनाथ संप्रदायातील सर्व नाथांची ही ध्यानभूमी असल्याचे आध्यात्मिक पुरावे नवनाथ कथासारात आहेत. शिवचरित्रात छत्रपती शिवाजींचा सुरतेच्या लुटीच्या दरम्यान येथील दर्शनाचा संदर्भ काही इतिहासकारांनी नोंदविलेला आहे.चैत्र नवरात्र (रामनवमी ते हनुमान जयंती), अश्विन / शारदीय नवरात्र (घटस्थापना ते दसरा), शाकंभरी पौर्णिमा (माहे जानेवारी), कोजागरी पौर्णिमा, दर महिन्याची दुर्गाष्टमी (नवचंडी व नगर प्रदक्षिणा उपक्रम) व पौर्णिमा उत्सव हे महत्त्वपूर्ण असतात. नवरात्र काळात धन मानाची पूजा (महापूजा) करण्याचा व पौराणिक परंपरेनुसार दरेगाव येथील गवळी समाजातील कुटुंबाला चैत्र व अश्विन नवरात्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्री भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याचा मान दिला जातो.

Post a Comment

أحدث أقدم