Hanuman Sena News

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव खाजगी बस ट्रकला धडकली





छत्रपतीसंभाजी नगर (सावंगी) : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची घटना ताजी असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.थरकाप  उडवणारी ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा खाजगी बस प्रवास सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खुराणा ट्रॅव्हल्स ची खाजगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस छत्रपती संभाजी नगर शहरातील सावंगी परिसरात आली असता लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवदानी झाली नाही मात्र बसमधील वीस प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यातील ११ प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात तब्बल 25 प्रवासांना आपला जीव गमावा लागल्याने समृद्धी महामार्गाबाबत मोठी टीका करण्यात आली होती. या अपघातानंतर खाजगी बसच्या प्रवास सुरक्षतेविषयी प्रश्नचिन्ह उभे करण्यात आलेले आहे. एकीकडे विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे खुराणा ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

أحدث أقدم