Hanuman Sena News

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी बुलढाण्यात निदर्शने; डी.एड.बी.एड पदवीधारक आक्रमक...







बुलढाणा : शिक्षकांच्या अभियोग्यता परीक्षेनंतर नियुक्ती प्रक्रिया लांबल्यामुळे डी. एड्. बी.एड्. पदवीधारक आक्रमक झाले आहेत. शिक्षक भरतीच्या मागणीसाठी सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघाच्यावतीने ११ मे रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. युवकांकडे शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता व काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असून देखील केवळ हाताला काम नाही म्हणून अनेक युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया ही मार्च २०२३ मध्ये राबविली होती. त्या प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजेच पवित्र पोर्टल नोंदनी सरकारने अद्याप चालु केलेली नाही. तरी ती लवकरात लवकर चालू करुन पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या वित्त विभागाने ८० टक्के म्हणजेच ५५ हजार पद भरतीसाठी मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया ही शिक्षण विभाग दोन टप्यात राबविणार असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रिया एकाच वेळी राबविली, तर सरकारचाही दुसरी भरती प्रक्रिया राबविण्याचा वेळ वाचेल व मुलांना ही रोजगार लवकर मिळेल. पुन्हा डी.डी, चालान, लायब्ररी यावर होणारा बेरोजगारांचा खर्च वाचेल, त्यामुळे शासनाने एकाच वेळी ५५ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांच्या नेतृत्वात शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रभाकर वाघमारे, सुधाकर धुरंदर, दिलीप गवई ,विकास मोरे, मंगेश बोचरे, गोपाल हिस्सल, नरेंद्र सावंत, सागर निकम ,अक्षय लोखंडे, अनिता टेकाळे, योगेश दंदाले, यांच्यासह डी.एड. बी.एड. पदवीधारकांची उपस्थिती होती. सर्व भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात राबविण्यात यावी व शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड यादी लावताना प्रतीक्षा यादी लावावी जेणेकरून एखाद्या उमेदवाराला दुसरीकडे संधी मिळाल्यास त्यांची जागा रिक्त न राहता प्रतीक्षा यादीतील उमेदवार त्या ठिकाणी भरता येईल अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم