Hanuman Sena News

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी...



नवी दिल्ली - बऱ्याच वर्षांनंतर अखेर काँग्रेसला नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे.आज झालेल्या मतमोजणीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांना तब्बल ७ हजार ८९७ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतांवर समाधान मानावे लागले. खर्गे यांना थरूर यांच्यापेक्षा आठ पट अधिक मते मिळाली आहेत. शशी थरूर यांनी आपला पराभव मान्य केला असून, त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी बऱ्याच वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाली होती.  या निवडणुकीसाठी सुरुवातील अशोक गहलोत यांचं नाव आघाडीवर होते. दरम्यान, निर्माण झालेल्या वादानंतर गहलोत यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली होती.  त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव समोर आलं होतं. तर त्यांच्या विरोधात शशी थरूर यांनी निवडणूक लढवली होती.दरम्यान, शशी थरूर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं अभिनंदन करणारं पत्र लिहिलं आहे. तसेच काँग्रेसच्या पुनरुद्धारास आजपासून सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी व्यक्त केली. 


Post a Comment

أحدث أقدم