Hanuman Sena News

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजले...

थेट सरपंचपदासह १,१६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे.शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांमध्ये कोणाचे पारडे जड राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Post a Comment

أحدث أقدم