मलकापूर:अजय टप
शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ व रहदारी वाढली आहे. यातच लहान मुले हे निष्काळजीपणे तसेच भरधावपणे वाहन चालविण्याचे प्रकार दररोजचे झाले आहेत. अशात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अशा अल्पवयीन मुलांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी वाहतूक पोलिस व शहर पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजच्या काळात सर्वांनाच कामे लवकर आटोपण्याची घाई असते. त्यामुळे वाहन रस्त्यावर चालवितांना अनेकदा नियमांना दुर्लक्षीत केले जाते. त्यामुळे एखादवेळी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता शाळा, महाविद्यालये, कॉलेजेस व विद्याथ्र्यांच्या ट्यूशन्स सुध्दा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळ, सायंकाळ व इतरवेळी मुले-मुली हे सर्रासपणे वाहने घेवून रस्त्यांवर चालवितांना दिसतात. अनेक मुले- मुली हे अल्पवयीन असतात. मात्र पाल्यांचा हट्ट व त्यांनाही या ट्यूशन वरून त्या ट्यूशनवर जाण्यासाठी होणारा त्रास व वेळ वाचावा यासाठी पालकही त्यांच्या हाती वाहने देतात. मात्र वाहन देतांना त्यांना वाहतुकीच्या नियमांचीही जाणिव करून देणे पालकांचे कर्तव्य असते. तशी कर्तव्याची जाणिव पालक करून देतही असतील, मात्र या अल्पवयीन मुला-मुलींकडून आपल्या ताब्यात वाहन आल्यानंतर सर्रासपणे भरधाव व निष्काळजीपणे चालविले जात असल्याचे अनेक प्रकार दररोज दिसून येतात. यामुळे एखादवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहन चालविण्याचा परवाना हा १८ वर्षांवरील असलेल्यांना मिळत असतो मात्र दररोज शहरात अनेक लहान मुले-मुली हे सर्रासपणे वाहन चालवितांना दिसतात. त्यांच्याकडून वाहन चालवितांना सर्वच नियमांची पायमल्लीही होते. एखादवेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या दुचाकीमुळे एखाद्या पादचाऱ्यास अथवा वाहनास धडक लागल्यास मोठी घटनाही घडू शकते. तेव्हा पालाकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहन देतांना सर्व बाबींचा विचार करणे खरोखर आवश्यक आहे. तसेच शहरात दररोज रस्त्यांवर अल्पवयीन मुलांकडून चालविण्यात येणाऱ्य वाहनांमुळे एखादी घटना घडू नये याकरीता वाहतूक पोलिस व शहर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यनी जनजागृती करण्याबरोबरच वेळप्रसंगी कठोर अशी पाऊले उचलणेही आववश्यक आहे. त्यामुळे एखादवेळी घडू शकणाऱ्य घटनेला वेळीच पायबंद लागू शकतो.
إرسال تعليق