Hanuman Sena News

राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक; नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो...





वर्धा :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गट पडून अनेक आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहे. मात्र आता अजित पवार गटातील आमदारांची घरवापसी होताना दिसत आहे. शरद पवार यांच्या गळाला अजित पवार यांच्या गटातील आणखी एक आमदार लागल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. वर्ध्यातील एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या कार्यक्रमात शरद पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्यासोबत नाईलाजामुळे गेल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. तसेच राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक देखील केलं आहे.वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. आयुष्यभर शरद पवार यांचा ऋणी राहणार असून त्यांनी नेहमीच सहकार्य केल्याचे शिंगणे म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचे कारणही सांगितले.३० वर्षे झाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय.  माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचे मी मान्य करतो. आयुष्यभर मी निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो. आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले आहेत. परंतु निश्चितपणे शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील," असे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं. दरम्यान, राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सुरु असलेल्या काका पुतण्या वादातही शिंगणेंनी अजित पवारांची बाजू घेतली होती. दादांना मुख्यमंत्री होण्यापासून काकाही रोखू शकत नाहीत, असं शिंगणे यांनी म्हटलं होतं. 

Post a Comment

Previous Post Next Post