बुलढाणा : विविध विभागांसह सीसीटीव्हीची करडी नजर, उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख आणि भरती स्थळाला असलेला पोलिसांचा गराडा, अशा कडक बंदोबस्तात आणि काटेकोर दक्षतेत येथे एकूण १३३ रिक्त पदांसाठीच्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून पूर्वनियोजित वेळेवर प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः पोलीस कवायत मैदानावरील भरती प्रक्रियेत सहभागी झाले.पोलीस जमादारची १२५ पदे (३८ महिला) आणि पोलीस बँड पथकाची ८ पदे मिळून एकूण १३३ रिक्त पदांकरिता ही भरती घेण्यात येत आहे. यासाठी तब्बल १० हजार २४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. एका पदाकरिता ७७ उमेदवार (अर्ज) अशी सरासरी असल्याने बेरोजगारीची समस्या किती गंभीर आहे, या निमित्ताने दिसून आले. मोठ्या संख्येतील पदवीधर व उच्च शिक्षित उमेदवार लक्षात घेता रोजगारासाठीची तीव्रता आणि स्पर्धाही दिसून आली.आज सकाळी भरतीला प्रारंभ झाला. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदान येथे प्रमाणपत्र तपासणी, छाती उंचीचे मोजमाप आणि शंभर मीटर धाव शर्यत घेण्यात येत आहे. बुलढाणा ते अजिंठा राज्य मार्गावर उमेदवारांची दमछाक करणारी १६०० आणि ८०० मीटर धाव शर्यत घेण्यात येत आहे. बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटल्यावर प्रवेशद्वारमधून कवायत मैदानात प्रवेश, प्रमाणपत्र तपासणी, छाती-उंचीचे मोजमाप करण्यात येत आहे. आज बुधवारी आणि उध्या गुरुवारी प्रत्येकी पाचशे तर नंतर दररोज ८०० उमेदवार पाचारण करण्यात आले आहे. ४ जुलैपर्यंत ही भरती चालणार आहे.दक्षता आणि यंत्रणांची नजर भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार घडू नये यासाठी काटेकोर दक्षता घेण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी भरती स्थळी, मोजक्या प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली. भरतीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,पोलीस गुप्तचर विभाग यासह सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे यांची करडी नजर राहणार आहे . ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. परीक्षेत डमी उमेदवार बसविणे आणि अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून घेण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. अर्जात चुकीची माहिती दिल्यास उमेदवाराला बाद करून त्याच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांस त्यांच्या उंची छातीचे मोजमापाबाबत तक्रार वा आक्षेप असल्यास त्याचाही विचार करण्यात आला आहे. भरती सक्षम प्राधिकारी आणि अपीलीय अधिकारी यांच्याकडून वेळीच तक्रार व आक्षेपाचे निरसन करण्यात येईल. तसेच दैनिक मैदानी चाचणीचे निकालपत्र दररोज मुख्यालयाच्या सूचना फलकावर व जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईलयंदाच्या या भरतीत तृतीयपंथी देखील पोलीस होण्यासाठी इतरांशी मुकाबला करणार आहे. हे या भरतीचे एक आगळे वैशिष्ट्य ठरले आहे. पोलीस जमादार होण्यासाठी एका तर बँड पथकात समाविष्ट होण्यासाठी दोघा तृतीयपंथीयांनी अर्ज दाखल केला आहे.
बुलढाणा : कडेकोट बंदोबस्तात पोलीस भरतीला प्रारंभ...
Hanuman Sena News
0
Post a Comment