Hanuman Sena News

धक्कादायक! अतिदक्षता विभागात (ICU) उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू ...



पुणे : मागील काही महिन्यांपासून वादात सापडलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. ससून रुग्णालयातील आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सागर रेणूसे (वय-30) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. सागरच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सागर रेणूसे याचा पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्च रोजी ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरु होते. मात्र, 26 मार्च नंतर त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता, उंदीर चावल्याचं समोर आलं. हा प्रकार पाहून नातेवाईंकांनी गोंधळ घातला. आयसीयु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर सागरची प्रकृती खालावली आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.सागर रेणूसे या तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. हा प्रकार समजताच सागरच्या नातेवाईकांनी ससून हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणूसेच्या शरीरावर उंदीर चावल्याचं मान्य केलं. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. ससून रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे सागरचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post