बुलढाणा - दोन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या वादात मुलांना समज दिल्याच्या कारणावरून चिखलीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी बुलढाणा न्यायालयाने शेख आहात उर्फ शेख शौकत शेख अहमद यास एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) यांनी हा निकाल दिला. चिखली येथील तक्षशिला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ८ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती. या शाळेमधील दोन विद्यार्थ्यांंमध्ये वाद झाला होता. एका शिक्षकाने त्यात मध्यस्थी करून मुख्याध्यापक सुनील हरिभाऊ वळसे यांना कल्पना दिली होती. त्यावेळी दाेन्ही मुलांना भांडण न करण्याची ताकीद मुख्याध्यापक सुनील हरिभाऊ वळसे यांनी दिली होती."दरम्यान, भांडण करणाऱ्या एका मुलाने त्याच्या घरी घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे त्या मुलाचे वडील शेख आहात उर्फ शौकत शेख अहमद यांच्यासह शेख जहीर रशीद अहमद, मो. आवेज बागवान, शेख सकलेन शेख सलीम, शेख शाकीर शेख साबीर हे शाळेमध्ये गेले व दहाव्या वर्गात मुलांना इंग्रजी विषय शिकवत असलेल्या मुख्याध्यापक वळसे यांना त्यांनी बेदम मारहाण केली. सोबत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रकरणी पोलिसांत तक्रार झाली होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करत तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.न्यायालयात सुनावणी दरम्यान एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तेथे उपस्थित काही शिक्षक हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकून बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) एस. बी. डिगे यांनी आरोपी शेख आहात उर्फ शेख शौकत शेख अहमद यास एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास यासह अन्य कलमान्वयेही शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपी शेख आहात उर्फ शेख शौकत अहमद यास एकत्रित भोगावयाच्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार आरोपींची संशयाचा फायदा घेत न्यायालयाने मारहाणीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. प्रकरणात वादी पक्षातर्फे सहायक वकील ॲड. आशिष केसाळे यांनी काम पाहिले. चिखली येथील कोर्ट पैरवी पोलिस हेडकॉन्स्टेबल नंदाराम इंगळे यांनी न्यायालयीन मदत केली.
मुख्याध्यापकास मारहाण, एकास एक वर्ष सश्रम कारावास, ऑगस्ट २०१८ मध्ये चिखलीत झाली होती मारहाण...
Hanuman Sena News
0
Post a Comment