बुलढाणा : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने उत्साहात असलेल्या महायुतीने आज, रविवारी एकाच दिवशी राज्यातील ३६ जिल्ह्यांत मित्रपक्षांचे मेळावे घेतले. बुलढाणा जिल्ह्यातील महामेळावा संतनगरी शेगाव येथे पार पडला. शिंदे गट बुलढाणा लोकसभेवर जोरकस दावा करीत असला तरी अद्याप उमेदवार निश्चित नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शिंदे गटातील राजकीय अस्वस्थता आणखी गडद झाल्याचे चित्र आहे.शेगावच्या हद्दवाढ परिसरातील रोकडीया नगर परिसरातील एका मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. या मेळाव्याविषयी काटेकोर गुप्तता पाळण्यात आली. हा युती अंतर्गत मेळावा असल्याचे सांगून प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मेळाव्याचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. मात्र, यावेळी उपस्थित युतीच्या काही नेत्यानी नाव न सांगण्याचा अटीवर दिलेल्या माहितीनुसार यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षासह १५ मित्रपक्षांचे मोजकेच नेते हजर होते.महायुतीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समन्वय समितीचे समन्वयक व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनात मेळावा पार पडला. समिती सदस्य शिंदे गटाचे नेते खासदार तथा उमेदवारीचे दावेदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले पाटील, शिवसेना आमदार संजय गायकवाड, भाजप लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे, चैनसुख संचेती, रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यासह घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष हजर होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार कुटे यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. युतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार जाधव, आमदार शिंगणे, रिपाइंचे नरहरी गवई यांचीही भाषणे झालीत. दरम्यान, २००९ ते २०१९ असे सलग तीनदा विजय मिळविणारे खासदार यंदाही उमेदवारीचे दावेदार आहेत. शनिवारी चिखलीत पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, उमेदवार जाधवच असतील आणि ते यंदा आघाडीचे ‘डिपॉझिट’ जप्त करतील, असे विधान केले. मात्र, शेगावातील मेळाव्यात उमेदवार ठरला नसल्याचे स्पष्ट झाल्याने महायुतीत चर्चेला व राजकीय तर्क-वितर्कांना पेव फुटले आहे.
बुलढाणा “जो उमेदवार असेल त्याचा ताकदीने प्रचार करावा”, महायुतीच्या गुप्त बैठकीतील सूर; उमेदवार ठरला नसल्याचे चित्र!
Hanuman Sena News
0
Post a Comment