Hanuman Sena News

चौपदरीकरण मूळ मार्गानेच करावे; खासदार रक्षा खडसेंचे मंत्री गडकरींना साकडे...



जळगाव: बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच म्हणजे रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी (ता. १४) दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेतली.बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी खासदार खडसे यांचा मागील काही वर्षांपासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता, त्यानुसार मागील वर्षी या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले असून, सध्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.आहे चौपदरीकरणासाठी डीपीआर तयार होऊन जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत ७ नोव्हेंबरला आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येऊन रावेर व सावदा शहरास चौपदरीकरणामध्ये वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.त्यामुळे हा मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न घेता स्थानिकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून घेण्यात यावा, यासाठी खासदार खडसे यांनी श्री. गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली व निवेदन दिले.याबाबत श्री. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार खडसे यांनी दिली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर आणि भोपाळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असून, त्यात खासदार नात्याने आपणही उपस्थित राहणार आहोत.या बैठकीत हा महामार्ग पूर्वीप्रमाणेच सावदा, रावेर शहरातून किंवा या शहारांजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून जावा, याबाबत आपण आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post