अमरावती : आईएवढेच बापही आपल्या मुलांवर प्रेम करत असतो. तोही आपल्या मुलावर जीव ओवाळून टाकण्यासाठी सदैव तयार असतो. त्याची प्रचिती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अनुभवायला मिळाली. अनंत माणिकराव इंगळे (५६) यांनी किडनी आजाराने त्रस्त २४ वर्षीय मुलाला किडनी दान करून जीवदान दिले. या रुग्णालयातील ही ३२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे.जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गौरखेडा येथील रहिवासी अंशुल अनंत इंगळे मागील दोन महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होता. दोन्हीही किडन्या निकामी झाल्याने तो डायलिसिसवर होता. मुलाला होणारा त्रास पाहून बापाचे काळीज रोज वर-खाली होत होते. अखेर अनंत इंगळे यांनी आपल्या या मुलासाठी आपली एक किडनी दान करून अंशुलला नवे जीवदान दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. प्रणित काकडे, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. नंदिनी देशपांडे, डॉ. अंजू दामोदर, आरएमओ डॉ. सुनीता हिवसे, किडनी ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी यांनी ही शस्त्रक्रिया केली. समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे यांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
बाप- बापच असतो.. किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण...
Hanuman Sena News
0
Post a Comment