बुलढाणा/धाड: विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर धाड पासून सात किमी अंतरावर असलेल्या म्हसला बुद्रूक येथे बुलढाणा पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांच्या गुटख्यासह १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल ९ नोव्हेंबर रोजी पहाटे जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. गेल्या सहा वर्षातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.जिल्ह्यात अंमली पदार्थांसह, गुटका विक्री व तस्करीचे प्रमाण वाढले आहे. धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसापूर्वी मध्यप्रदेशातून मराठवाड्यात नेण्यात येत असलेला २० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्या कारवाईपाठोपाठ ही माेठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व धाड पोलिसानी केली आहे.८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने एलसीबी आणि धाड पोलिसांनी म्हसला गावानजीक सापळा रचला. त्यामध्ये डीडी-०१-सी-९१३१ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यातील ९१ लाख ८८ हजार रुपयांचा ४ क्विंटल ५९ किलो ४०० ग्रॅम गांजा, २२ लाखांचा एक ट्रक, दोन मोबाईल असा १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात राहूल गोटीराम साबळे (२७ रा. कुऱ्हा ता. मोताळा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा दुसरबीड येथील एक सहकारी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय अशोक लांडे, व अमलदारांचे एक स्वतंत्र पथक अमली द्रव्यासंदर्भात कारवाईसाठी गठीत करण्यात आले आहे. या पथकासह सहाय्यक पोलिस निरीक्षक मनिष गावंडे, नंदकिशोर काळे, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, गजानन माळी, शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, दीपक लेकूरवाळे, राजकुमार राजूपत, अनंता परताळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश सोळंके हे करीत आहेत.कोरोना काळात सुंदरखेड परिसरात करण्यात आलेली एक कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतरची धाडनजीक करण्यात आलेली दुसरी मोठी कारवाई आहे.
Post a Comment