Hanuman Sena News

नोकरीच्या आमिषातून महिलेची साडेपाच लाख रुपयांनी फसवणूक




नांदुरा : मोठ्या राजकीय पुढाऱ्यांशी संबंध असल्याचे भासवून नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील एका भामट्याने नांदुरा येथील महिलेची साडेपाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना १४ फेब्रुवारी २०२२ ते ६ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांत त्या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या अर्चना हरीभाऊ बावस्कार (३६) या महिलेने नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी सुनील रतन आठवले (रा. मुंबई) याने ओळख निर्माण केली. तसेच मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध असून नोकरीबाबतचे कोणतेही काम असेल तर सांगा, ते करून देईन, अशी बतावणी केली. त्यानुसार बावस्कार यांच्या नातेवाइकाच्या नोकरीचे काम करून देण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी रोख स्वरूपात, कधी आरटीजीएस तर कधी ऑनलाइन व्यवहाराद्वारे ६ लाख रुपये घेतले. नंतर आरोपीने सरकार बदलल्यामुळे काम झाले नाही, पैसे परत करतो असे म्हणून ६ ऑक्टोबर २०२२ रोजी क्षीरसागर यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम साडेपाच लाख रुपयांबाबत आरोपीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पैसे परत केले नाहीत. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे म्हटले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील रतन आठवले याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपास मुरलीधर वानखेडे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post