Hanuman Sena News

मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील सहा विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा...





चिखली : गौरी पूजनानिमित्त सगेसोयरीक मंडळींना सुग्रास जेवण वाढण्यासाठी जबाबदारीचे भान विसरलेल्या येथील मागासवर्गीय मुलींचे तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षक स्पृहा जोशी यांनी ऐन सणासुदीत वसतिगृहातील मुलींना अळ्या व कीटकयुक्त अन्न खाऊ घातले. या प्रकारामुळे वसतिगृहातील ६ मुलींना विषबाधा झाली. परिणामी, रात्री २ वाजता येथील एका खासगी रुग्णालयात मुलींना दाखल करावे लागले.दरम्यान, याची गंभीर दखल घेत, आमदार श्वेता महालेंनी समाज कल्याणच्या सहा.आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्याकडे तक्रार करून, वसतिगृह अधीक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत संताप व्यक्त केला. मागावसर्गीय मुलींचे तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना २२ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अळ्या पडलेले अन्न खाल्ल्याने या मुलींना विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी वसतिगृह प्रशासनाने मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल न करता, खासगी रुग्णालयात दाखल केले. सोबत रुग्णालयात दाखल मुलींना या प्रकाराबाबत बाहेर कुठेही वाच्यता कराल, तर तुमचे ‘करिअर’ बर्बाद करू, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, सकाळी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठल्यानंतर वसतिगृहातील हा प्रकार उघडकीस आला. विषबाधा झालेल्या सर्वच मुली बुलडाणा जिल्ह्यातील व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळताच, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी रुग्णालयात दाखल होत, मुलींची विचारपूस केली. वसतिगृहाच्या पाहणीत येथील मुलींचे हाल होत असल्याचे उघडकीस आले. प्रामुख्याने चार्टनुसार पोषक आहार दिला जात नाही.मुलींना दिल्या जाणाऱ्या जेवनात व नाश्त्यात अळ्या, कीटक आढळतात. पोळ्या कच्च्या असतात.वस्तीगृहात अस्वच्छता आहे. सोबतच मुलींना सॅनिटरी पॅड सुविधांची वानवा असल्याचे समोर आले.

Post a Comment

Previous Post Next Post