देऊळगाव राजा : कुठे मेट्रो, तर कुठे बुलेट ट्रेन धावत आहे. पण, अजूनही काही गावांत एस.टी. महामंडळाची बस पोहोचलीच नसल्याचे दिसून येते. त्यातीलच एक गाव देऊळगाव राजा तालुक्यातील आहे. तालुक्यातील किन्ही पवार येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली. मंगळवारी गावात एस.टी. बस येताच गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.राज्यातील काही असेही गावं आहेत, जिथे ट्रेन, तर सोडाच साधी बससेवाही उपलब्ध नाही. देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार या गावात आतापर्यंत एस.टी. नव्हती. दरम्यान, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी येथे एस.टी. बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. अखेर किन्ही पवार गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.किन्ही पवार येथे बस नसल्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या गावातील जवळपास २९ मुली शिक्षण घेण्यासाठी देऊळगाव राजा शहरात जातात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मुली शिक्षण घेण्यासाठी जात असताना, १ हजार ५०० रुपये मासिक खर्च त्यांना सहन करावा लागत होता परंतु आता मानव विकास मिशनची बसफेरी सुरू झाल्याने २९ विद्यार्थिनींच्या शहरातील शिक्षणाची वारी सुकर झाली आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली गावात एस.टी.बस
Hanuman Sena News
0
Post a Comment