Hanuman Sena News

पोळा अन् सण झाले गोळा; सर्जा- राजाची खांदेमाळण आवतन आज जेवण...







मलकापूर:  पूर्वपारपासून शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण असलेला पोळा गुरूवार, १४ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी परंपरेनुसार सर्जा-राजाची खांदेमळण करण्याची प्रथा शेतकऱ्यांनी १३ सप्टेंबर रोजी पार पाडली. लाडक्या बैलांची स्वच्छ आंघोळ घालून आणि तूप व हळदीने मालिश करून उद्याच्या जेवणाचे आवतन दिले.प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी यादिवशी सर्व कामे बाजूला सारून केवळ बैलांच्या सजावटीत गुंतलेले असतात. यंदाही ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, त्यांनी १३ सप्टेंबरपासून पोळ्याच्या तयारीला सुरूवात केली असून नदी-नाल्यांवर नेत बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. ज्वारीचे फळ, वरण, भरडा यासह भोजन देवून आज आवतन घ्या आणि उद्या अर्थात पोळ्याच्या दिवशी जेवायला या, असे बैलांना सांगण्यात आले.बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते बैल पोळा पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रुपात धर्तीवर अवतरले होते, तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

Post a Comment

Previous Post Next Post