खामगाव: तब्बल ५०० कट्टे तांदूळ काळ्या बाजारात जाण्यापूर्वीच खामगाव शहर पोलीसांनी पकडला. शुक्रवारी स्थानिक जयपूर लांडे फाट्यावर गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरातील रेशन माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून खरेदी करून साठविण्यात आलेल्या ५०० कट्टे तांदळाची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांना मिळाली. या माहितीची खात्री पटली. त्यानंतर एएसपी पथकाने सापळा रचून नवीन अकोला बायपासवर नांदूरा येथून अकोला मार्गे छत्तीसगढ येथे जात असलेला एमएच ३७ जे ११८९ या क्रमांकाचा ट्रक पकडला.या ट्रकमध्ये रेशनच्या तांदळाचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे ५०० कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला. हा तांदूळ ट्रकसह खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालक रविंद्र शेषराव महल्ले ४५ रा. गाडगेनगर, जुने शहर अकोला, मदतनीस नरेश निळकंठ मेश्राम याला ताब्यात घेतले. िजल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक अशोक थारोत, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे, सपोनि सतीश आडे, पोहेकॉ रामचंद्र भोपळे, पोहेकॉ श्रीकृष्ण नारखेडे, पोहेकॉ सुधाकर थोरात, निलेश चिंचोळकर,पोकॉ हिरा परसुवाले यांनी ही कारवाई केली.रेशनच्या तांदळाचे नवीन नांदुरा कनेक्शन घाटाखालील सहा तालुक्यांसह मोताळा तालुक्यातील रेशनच्या तांदळाची नांदुरा, निपाणा, तरवाडी, मलकापूर, जळगाव जामोद येथे खरेदी आणि साठवणूक केली जाते. त्यानंतर हा तांदूळ अकोला मार्गे छत्तीसगढ तसेच अकोट मार्गे मध्यप्रदेशात पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. एक मोठे रॅकेटच तांदळाच्या तस्करीत गुंतले आहे. मात्र, सुत्रधारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार पोफावत असल्याचे दिसून येते.
अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची धडक कारवाई ; काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 500 कट्टे तांदूळ पकडला...
Hanuman Sena News
0
Post a Comment