Hanuman Sena News

उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'







मुंबई : शरद पवार कितीही काहीही म्हणत असले की त्यांचा काही संबंध नाही, तरीही दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे मोठे नेते असेच  शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत हे नक्की आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असे रोखठोक मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. राज्यात रविवारी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये अचानक अजित पवार यांची एन्ट्री झाली. शरद पवारांनी या बाबी अमान्य असल्याचे सांगितले. पण अजित पवार आणि इतर मातब्बर मंडळींनी मंत्रिपदाची शपथ घेण्यामागे शरद पवारांचाच आशीर्वाद आहे, असे ठाम मत राज यांनी मांडले.महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांचाही समावेश असल्यामुळे, हे बंड शरद पवारांच्या मर्जीनेच झाले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. या दरम्यान, शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली. या बंडाला आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटले. पण तरीही राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा या बंडामागे शरद पवार असल्याचाच ठामपणे दावा केला. तसेच, उद्या सुप्रियाताई केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य़ वाटू नये अशी खोचक प्रतिक्रियाही दिली."महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून जे राजकारण सुरू झालं होते, ते दिवसेंदिवस अधिक किळसवाणं होत चाललंय. मतदारांशी आता कोणालाही काहीही देणं घेणं उरलेलं नाही. कोण कुठल्या पक्षाचे खंदे समर्थक किंवा मतदार होते, ते का होते याचा साऱ्यांनांच विसर पडला. स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करण्याच्या गोष्टी राज्यात सुरू आहेत. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे .मी राज्यभर फिरणार आहे .तेव्हा मी जागोजागी बोलेन असेही राज ठाकरे म्हणाले. रविवारी देखील राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणावर भाष्य केले होते. आज महाराष्ट्र सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील झाला आहे. उद्धव ठाकरेच ओझर शरद पवारांनी उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला.पवारांची ( राष्ट्रवादीची ) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली. यथावकाश दुसरी पण सत्तेसाठी रुजू होईलच असं ट्विट करत राज ठाकरेंनी शरद पवारांना लक्ष केल. अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही राज ठाकरे आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसले.

Post a Comment

Previous Post Next Post