Hanuman Sena News

बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्याची लुट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस...




खामगाव : ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस  कृषी विभागाकडून करण्यात आली. त्वरित बियाणांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचा भंडाफोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला. त्यानंतर कृषी विभागात एकच तारांबळ उडाली. कृषी अधिकाऱ्यांनी धडक देत उपरोक्त कारवाई केली.खामगाव शहरातील सरकी लाइन भागातील अंकुर कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उजेडात आला. बियाणासाठी शेतकऱ्यांकडून प्रतीबॅग ३६०० रुपयांऐवजी ६०० रुपये अतिरिक्त आणि हमालीची किंमत अधिक घेतल्या जात असल्याचे उघडकीस आले.या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रावर धडक दिली. संतप्त शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तक्रारदार शेतकरी पिंटू लोखडकार, रा. नागापूर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संबंधित कृषी केंद्र आणि गोदामातील बियाणांच्या साठ्याची मोजणी सुरू केली.पंचनामा करण्यात आला. त्यानंतर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली.  उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,  तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री देसले, कृषी पर्यवेक्षक विलास परिहार, कृषी सहायक नितीन कोळी यांनी ही कारवाई केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.गोदामाची तपासणी शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून संबंधित कृषी केंद्रासह कृषी केंद्राच्या अखत्यारितील गोदामाचीही तपासणी करण्यात आली. तत्काळ परवाना निलंबित करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली होती.मात्र नियमानुसार चौकशीच्या स्वरूपातून कारवाई केला जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तेव्हा शेतकरी वर्ग शांत झाले.

Post a Comment

Previous Post Next Post