Hanuman Sena News

धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल-शंभूराज देसाई...


मुंबई : शिवसेना पक्षावर कोणत्या गटाचा अधिकार राहील, या मुद्यावर सुरू असलेली सुनावणी आज मंगळवारी पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत आहे. त्यामुळे, कदाचित आजच या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डाव्होस दौऱ्यावर आहेत. तर, दुसरीकडे राज्य सरकार अनधिकृत असल्यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता १४ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. त्यामुळे, ही सुनावणीही त्यानंतरच घेण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी केली आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा हक्क राहील, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिंदे गटातर्फे खासदार महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. मंगळवारी ठाकरे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची पाच वर्षांची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. यामुळे या सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. २३ जानेवारीपूर्वी शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली.केद्रीय निवडणुकांबाबत जे जे आम्हाला मागण्यात आलं, तेते आम्ही सुपूर्द केलं. आमदारांचे बहुमत, खासदाराचे बहुमत आणि पक्षातील जिल्हा प्रमुखाचे बहुमतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. या सगळ्याबाबींचा विचार करून अधिकृत रित्या आम्हाला निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देईल असा विश्वास शंभूराजे देसाईंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post