Hanuman Sena News

बुलढाण्यात कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न...





बुलढाणा: घरफोडीच्या गुन्ह्यात मागील महिनाभरापासून जिल्हा कारागृहात असलेल्या एका बंदीवानाने ३ नोव्हेंबर रोजी हायमास्ट खांबावर चढून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्याला हायमास्ट खांबावरून खाली उतरविण्यात आले. या प्रकरणी कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीवरून त्या बंदीवानावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शेगाव शहर पोलीस स्टेशनअंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यात मंगेश सुभाष सोळंके याचा समावेश होता. त्यास १७ ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. दरम्यान, त्याने ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कारागृह कर्मचारी आणि बंदीवानाची नजर चुकवून कारागृहात असलेल्या हायमास्ट खांबावर चढून त्याने टॉवेल बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्याला खाली उतरवून त्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर कारागृह अधीक्षक चंद्रकांत आवळे यांच्या तक्रारीवरून मंगेश सोळंके याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.कुटुंबीय जामिनासाठी प्रयत्न करीत नसल्याचा आरोप कारागृह अधीक्षक चंद्रकांत आवळे यांनी बंदीवान मंगेश सोळंके यास या कृत्यामागील कारण विचारले असता, घरफोडीतील इतर सहकाऱ्यांची त्यांच्या कुटुंबीयांनी जामीन करून घेतला. मात्र, माझ्या जामिनासाठी कोणीच प्रयत्न करीत नसल्याने, निराश झालो, म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे त्याने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post