Hanuman Sena News

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल देगलूर मध्ये भव्य स्वागत...







नांदेड: अखंड भारताची साद घालत कन्याकुमारीपासून निघालेली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा सलग दोन महिने प्रवास करून सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री तेलंगणामार्गे नांदेडच्या देगलूरमध्ये, अर्थात महाराष्ट्रात दाखल झाली. राहुल यांनी हात उंचावून केलेल्या अभिवादनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले.काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या मेनूर येथून रात्री ९.३० च्या सुमारास पदयात्रा देगलूर शहरात दाखल झाली. शेकडो वाहनांचा ताफा, पायी चालणारे कार्यकर्ते यांच्यासह पदयात्रा शहरात दाखल होताच नागरिकांनी जोरदार स्वागत केले. नगर परिषदेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राहुल गांधी मुख्य मंचावर दाखल झाले. अतिशय साधा मंच उभारण्यात आला होता. राहुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यकर्त्यांचा उत्साहस्वागतासाठी राज्यभरातून देगलूर शहरात कार्यकर्त्यांचे जथे दाखल झाले आहेत. कुणी चारचाकी, तर कुणी दुचाकीने देगलूर गाठत होते. दिवसभर विविध मार्गांवरून रॅली काढण्यात येत होत्या. हातात तिरंगा ध्वज आणि विविध घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. राहुल गांधी यांना पाहण्याची उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. दुपारपासून हजारो कार्यकर्ते पदयात्रा मार्गावर प्रतीक्षा करीत होते. शहरात २ किमी अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. शहरात जागोजागी स्वागताचे होर्डिंग्ज लागले आहेत. अनेकांनी राहुल यांचे कटआऊट आणि ‘वेलकम राहुल गांधी’ असे लिहिलेले बॅनर्स हाती घेतले होते.देशभरातील नेतेही दाखलकाँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, जयराम रमेश, हुसेन दलवाई, ॲड. शिवाजीराव मोघे, सुनील केदार, भाई जगताप, विश्वजित कदम, माणिकराव ठाकरे, सचिन सावंत, कुमार केतकर,  प्रणिती शिंदे, आमदार अमर राजूरकर, अतुल लोंढे, जम्मू- काश्मीरच्या प्रभारी खा. रजनी पाटील, संजय निरुपम आदींसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post