Hanuman Sena News

राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांसोबत बॅनरवर फोटो "एकदम ओके" म्हणत शेतकऱ्याने मानले आभार...


सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे बँक खात्यामध्ये पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान जमा होताच वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथे एकदम ओके म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार राजू शेट्टी यांचे आभार मानणारा फलक मंगळवारी झळकला. यामुळे या डिजिटल फलकाची वेगळी चर्चा हातकणंगले मतदार संघामध्ये सुरू झाली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नियमित कर्जदार शेतकर्‍यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. याबाबतची केवळ घोषणाच झाली होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हाती रक्कम पडली नव्हती. या अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्राही सप्टेंबर 2020 मध्ये काढली होती. तरीही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जुलै 2022 मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या आंदोलनाची दखल घेत हाती सत्ता येताच राज्यातील शिंदे सरकारने  शेतकर्‍यांच्या नावांने प्रोत्साहन अनुदान जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि अंमलातही आणला. यामुळे रेठरे धरण येथे आज एका कार्यकर्त्यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खा. शेट्टी यांचे छायाचित्र असलेले डिजीटल फलक लावले.माजी  खा.  शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला असून सध्या संघटनेचा एकला चलोचा नारा दिला आहे. मात्र, राज्यातील बदलत्या स्थितीत संघटनेची भूमिका नेमकी कशी असेल याचे तर्क वितर्क या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. 

 

Post a Comment

Previous Post Next Post