Hanuman Sena News

चुलत भावांमध्ये वाद एकाचा सुरा खुपसून खून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर...



मलकापूर (बुलढाणा) : चुलत भावांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीनंतर धारदार सुरा पोटात, बरगड्यात खूपसून एकाचा खून करण्यात आला. मलकापूर तालुक्यातील भालेगावात गुरूवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मारेकरी स्वतः पोलिसात जमा झाल्याची माहिती आहे.भालेगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील परिसरात गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रदीप पद्माकर वानखेडे (३४), अशांत उर्फ कडू अशोक वानखेडे (२८) या नात्याने चुलत भाऊ असलेल्या दोघा तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत अशांत उर्फ कडू याने लोखंडी सुऱ्याने प्रदीप वानखेडे याच्या पोटात व बरगड्यांवर लोखंडी सुऱ्याने सपासप वार केले. त्यामुळे प्रदीप वानखेडे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी धाव घेतली. गंभीर जखमीला उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले.प्रथम खासगी त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी गंभीर जखमीला मृत घोषित करण्यात आले. गुरूवारी रात्री भालेगावातील ग्रामस्थांनी दवाखान्यात एकच गर्दी केली. घटना घडल्यानंतर मारेकरी अशोक (कडू) वानखेडे स्वतः पोलिसात जमा झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, तर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post