मुंबई : राज्यात ७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करत पारदर्शकपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवण्याची घोषणा करताना संबंधितांना भरतीचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ वरून आता २० इतक्या वाढविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.
राज्यात लवकरच पोलीस भरती पोलिसांच्या रजाही वाढल्या...
Hanuman Sena News
0
Post a Comment